येईल का केंव्हा मला मातीप्रमाणे वागणे
भेगाळल्यावरही तिला जमते कसे ओलावणे
काही तरी असतील त्याच्या शांततेची कारणे
सागर कसा विसरेल त्याचे गर्जणे फेसाळणे ?
मी पाहिले नाही कधी सूर्या तुझे वैतागणे
झाकोळल्यावरही पुन्हा दिसते तुझे तेजाळणे
हे हात आकाशास माझे शक्य नव्हते लागणे
तू भेटल्यावरती अता आकाश झाले ठेंगणे
थोडे जरा भांबावणे थोडे पुन्हा सांभाळणे
होते किती सुंदर तुझे चोरून येणे भेटणे
सोडून दे ना तेवढे केसात गजरा माळणे
अवघड किती जाते मला ताबा मनावर ठेवणे
तू टाळले होतेस वा होते तिचे ते टाळणे
आता अनंता व्यर्थ हे सारे तुझे पडताळणे
अनंत देशपांडे