गझल
वृत्त - राधा
हे खरे... प्रत्येक वेळी जिंकलो नाही
पण कधी लढल्याविनाही हारलो नाही
बोलतो परखड असावा दोष हा माझा
त्यामुळे तर मी कुणाला भावलो नाही
सोसले लहरीपणाचे वागणे त्यांचे
मी ऋतूंशी वाद घालत भांडलो नाही
ती विनाकारण अशी अस्वस्थ का आहे
मी तिच्याबद्दल कुठे जर बोललो नाही
सोडल्यावर एकदा ताठरपणा माझा
मी प्रसंगी वाकलो पण मोडलो नाही
भासली अल्हाद पण फसवी निघाली ती
मी धुक्याची वाट नंतर चाललो नाही
शोधला आहे स्वत: रस्ता स्वतःसाठी
मी दिशांना साद घालत थांबलो नाही
अनंत देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा